क्षण क्षण
विझतो
कण कण
झिजतो
तरीही
कसा मी
बाकी उरतो?
मी रोज
हरतो
मी रोज
मरतो
तरीही कसा
जिवंत ठरतो?
सारे गेले पुढे। राहिलो मी मागे। परि देव असे माझा। ....माझ्या मागे।। - महेंद्र फाटे
झाली कधीच पिवळी
पाने आशेची कोवळी
नको देऊ आता पाणी
नाही फुलणार कळी
जेव्हा फुलायचे होते
तेव्हा झुलविले तूच
मला हसायचे होते
तेव्हा रडविले तूच
फार उशिरा तू आला
वेड्या, बहर संपला
कळी कोमेजून गेली
मुग्ध सुगंध लोपला
सारा उडेल पाचोळा
नको होऊस तू वारा
तुझी फुंकरही आता
मला वादळाचा मारा!
...आता तुमच्या हातात
बावन्न पत्त्यांचा
एक संच असेल;
दोन रंगी-
वास्तवदर्शी काळा
स्वप्नील गुलाबी....
रंगांच्या भानगडीत पडू नका;
पिसत राहा
अगदी पिसे लागेपर्यंत
कारण,
त्यातच असेल
तुमची पिशी हटविणारा
हुकमी एक्का...
सापडला तर बेहत्तर
नाहीतर बोंबलत बसा
गुढीपाडव्यापासून
थेट होळीपर्यंत!
(काव्यांश)
ज्याच्यासाठी
केला होता अट्टहास
त्यानेच लावला
गळ्याला घट्ट फास
श्वासात होता केवळ
ज्याचा ध्यास
त्यानेच रोखला
अखेर माझा श्वास!
ताडांच्या-माडांच्या
चंदनी खोडांच्या
गर्दीत नसले
तरी
झाडाझुडपांच्या
रापलेल्या दगडांच्या
सहवासात असावे
आपले घर
त्या घरात
दरवळत राहावा
रानकोवळ्या
सोनपिवळ्या
रानफुलांचा
सुगंधी स्वर...!
तुझे बांधलेले केस
माझ्या भविष्याला फास
सोड आता ते मोकळे
माझा कोंडला गं श्वास
तुझे मिटलेले ओठ
माझ्या भिजल्या पापण्या
किती घेशील अजून
माझ्या प्रेमाच्या चाचण्या?
तोड बंधने तू सारी
जोड बंधने ही न्यारी
चल अबोध धुक्यात
घेऊ गगनभरारी
मला म्हणालीस काही
काय म्हणालीस- "नाही'...!
एका शब्दानेच तुझ्या
धुके विरून गं जाई