Wednesday, May 7, 2008

जीवनालेख...

आपल्याच सोंडेने

आपल्या अंगावर

स्तुती फवारून

"हाथी चले अपनी चाल' म्हणावं

विरोधकांना कुत्रे समजून

भुंकू द्यावं...

कानामध्ये

वार्धक्‍याची मुंगी गेली

की कण्हावं... कुथावं

अन्‌ एक दिवस उलथावं!

यौवनाच्या मस्तीत

अंदाज चुकल्यानं

पेटल्या दिव्यानं

आपली संकुचित प्रतिमा

एन्लार्ज करून

त्याखाली

आपला जीवनालेख रेखाटावा-

"तीर्थरूप श्री. अमुक अमुक

जन्म तमुक मृत्यू ढमुक'

Sunday, May 4, 2008

नियती

मी बांधत असतो इमला
जमवून पत्ता पत्ता
नियती फुंकरते हळुवार
कोसळतो पत्ता पत्ता

आपल्या जगण्यावर नसते
आपलीच कसलीही सत्ता
हे सत्य शतजन्माचे
मज कळले आत्ता आत्ता

आवर्त हे अनिवार
की कुट्‌ट कृष्णविवर
जगणे म्हणजे मरमर
मज कळले आत्ता आत्ता

धगधगते कर्पूरकाया
आयुष्य जाते वाया
क्षणभंगुर उरते छाया
मज कळले आत्ता-आत्ता