Sunday, July 27, 2008

झाड आणि पाखरू (८)

सायंकाळ

होताच

करून

नखरे

फांद्याफांद्यांतून

डोकावतात

पाखरे!

Saturday, July 26, 2008

झाड आणि पाखरू (७)

बोलता-चालता
येत नाही...
झाडे जगतात
कशासाठी?
बहुधा,
त्यांच्याभोवती
किलबिलणाऱ्या
पाखरांसाठी...!

Thursday, July 24, 2008

झाड आणि पाखरू (६)

वसंतात

पाखरांचा

सहवास...

शिशिरात

खेळ

खलास!

Wednesday, July 23, 2008

झाड आणि पाखरू (५)

वाऱ्याने

वाहत राहावे

पाखराने

गात राहावे

मुक्‍या

पांगळ्या

झाडाने

स्तब्ध

शांत

पाहत राहावे

Monday, July 21, 2008

झाड आणि पाखरू (४)

झाडावर
पक्षी आले
पर्णांचे
पैंजण झाले
मैफल संपता
पक्षी
झाडास
सोडुनि गेले...

Sunday, July 20, 2008

झाड आणि पाखरू (3)

झाडाखालचा
पाचोळा
म्हणजे
एक कोडं...
बहुधा
जगण्यासाठी
केलेली
तडजोड!

Thursday, July 17, 2008

झाड आणि पाखरू (२)

पाखराच्या
चोचीमध्ये
जीव
झाडाचा गुंतला
सवे
उडायचे होते
पाय
मातीत रुतला...

Wednesday, July 16, 2008

झाड आणि पाखरू (१)

काल

पाखराला

आधार दिलेला

तुझा हात

आज

रिक्त आहे...

वेड्या,

फांद्याफाद्यांवर

उडणारी

ही

पाखरांची

जात आहे!

Tuesday, July 15, 2008

पाऊस (६)

बेभान

पावसाने

केले

मला

ओलेचिंब...

जलही

थरथरले

कसे पाहू?

प्रतिबिंब!

Saturday, July 12, 2008

पाऊस (५)

किती तरी
यज्ञ केले
पाऊस काही
आला नाही...
आता
हे धगधगते
यज्ञकुंड
विझवायचे
तरी कसे?

Sunday, July 6, 2008

सत्कार!

दमलो!...
झाले फार
वाटते आता
व्हावे ठार...
स्वतःच्या
हाताने
स्वतःच्याच
गळ्यात
घालून घ्यावा
पुष्पहार...
करावा
स्वतःच स्वतःचा
अंतिम
जंगी सत्कार!

Friday, July 4, 2008

पाऊस (४)

दिवस आले

गरजत

पावसाचे

सृष्टीने केले

स्वागत

पावसाचे

तू मात्र

बसलास

घरात एकटाच

लिहीत ते गीत

पावसाचे

माझ्या नयनी

अश्रू...

की ओघळती

थेंब ते

पावसाचे?