Sunday, April 27, 2008

जगणे

क्षण

जगण्याचा

एक पुरे

मग जगण्याची

आस नुरे!

जगणे

म्हणजे

असते काय?

तान्हे वासरू

आणिक गाय

सड पिळवटता

रक्त निघते

वासरू बिचारे

मुकाट बघते...

असे

जगणे फसता

मरण

विचकट हसते!

Saturday, April 26, 2008

स्तब्ध

वाऱ्याने

वाहत राहावे

पाखरांनी

गात राहावे

मुक्‍या-पांगळ्या

झाडाने

स्तब्ध-शांत

पाहत राहावे...

Wednesday, April 23, 2008

संघर्ष

महावृक्षांचा संघर्ष

होता

ठिणगी पडते

छायेखालील बिचारे

तृण

उगाच जळते

Sunday, April 20, 2008

जीवनात...

या जीवनात
हरेक
अनुभव
घ्यावा...
अगदी
मृत्यूचाही!
त्याआधी
सर्वांगाने
आस्वाद
घ्यावा...
जगण्याचाही!

Monday, April 14, 2008

आता...

जेव्हा बोलायचे होते
तेव्हा बोललोच नाही
आता बोलायचे आहे
बोलताच येत नाही
करण्यासे होते खूप
तेव्हा केले नाही काही
आता करायचे आहे
कुडीमध्ये त्राण नाही

Sunday, April 13, 2008

कोडे....

भीत भीत मी घातले

पापण्यात तू मिटले

उभ्या आयुष्याचे कोडे

एका क्षणात सुटले!

मुठी आवळून सखी

तू जे गुपित झाकले

एका हुंदक्‍यासरशी

अवचित गं फुटले

गीत ओठांवर येता

दाताखाली तू दाबले

दात-ओठ आज तुझे

बंड करून उठले

ज्याची होती तुला भीती

नाही वादळ उठले

साऱ्या मर्यादांचे बंध

आपोआप गं तुटले

उभ्या आयुष्याचे कोडे

एका क्षणात सुटले!

Wednesday, April 9, 2008

माझ्याबाबतीत...

वाऱ्याच्या

हळुवार झुळकीनं

पानं सळसळतात

वृक्षात

मधुर चैतन्य येतं...

तसंच काहीसं

घडलं होतं-

तुझ्या

नाजुक हास्यलकेरीनं

...माझ्याबाबतीत!

वसंत येतो

वृक्ष बहरतात

पक्षी आनंदगान गातात

नेहमीप्रमाणे

शिशिर येतो

पानं झडतात

चैतन्य सारं

घेऊन जातात

तसंच काहीसं

झालंय सध्या

माझ्याबाबतीत!

नशीबफाटका

मी

नशीबफाटका

न घर का

न घाट का

वाटले

उन्हात

सावली मिळाली

रणरणती दुःखे

दूर पळाली

जरासा

विसावताच

लागतसे चटका...

मी

नशीबफाटका...

Sunday, April 6, 2008

चिरंतन...

सुख-

चुकलेला

हृदयाचा ठोका

दुःख म्हणजे

माझा श्‍वास आहे

वेदना-

असते चिरंतन...

अन्‌ मला

चिरंतनाचा

ध्यास आहे!

माझ्यामागे

प्रयत्न
शिवण
प्राक्तन
उसव
नशीब
हा ससा
मी....
कासव!
सारे
गेले पुढे
राहिलो मी
मागे
परि
देव असे
माझा...
माझ्यामागे!

Saturday, April 5, 2008

चकवा

अगम्य

रात्रीनंतर

यावी

आशादायी

रम्य

पहाट...

परि

आयुष्याला

बसता

चकवा

गवसत

नाही

पाऊलवाट...

Friday, April 4, 2008

सारेच जीवघेणे...

आपल्याला

काय घेणे?

सारेच

येथे

जीवघेणे...

डरून

राहावे

अन्‌

उरावे

हाच

सुविचार आहे!

Wednesday, April 2, 2008

वीर!

कोण येथे शूर आहे?

कोण येथे वीर आहे?

वाघाचे कातडे पांघरणारा

मनाने मांजर आहे!

फुरफुरती बंद दाराआड

आमुचे बाहु जरी

फ्लॅटसंस्कृत फ्रीजमधले

रक्त थंडगार आहे!

अन्यायाच्या सुरस कथा

ऐकून घ्या - सोडून द्या

लढण्यास त्यांच्याविरुद्ध

कुणात इथे जोर आहे!

(काव्यांश)

Tuesday, April 1, 2008

मी

रिक्त मी

परि गजबजतो

भक्त मी

हरि ना भजतो

वीर मी

परि बावरतो

शूर मी

तरी घाबरतो?

मी

रुजतो

अंकुरतो

फुलतो

डुलतोही...

परि अचानक

कसा वठतो?

मी

फुरफुरतो

सरसरतो

फुत्कारतोही...

तरी

कुणाच्या लाठ्यांनी मरतो?

चूक

एकदाच

चुकायचे

जन्मभर

घोकायचे

क्षणभर

सुखासाठी

आयुष्यभर

झुकायचे!