Tuesday, January 29, 2013

मी


रिक्त मी
परि गजबजतो
भक्त मी
हरि ना भजतो
वीर मी
परि बावरतो
शूर मी
तरी घाबरतो?
मी
रुजतो
अंकुरतो
फुलतो
डुलतोही...
परि अचानक
कसा वठतो?
फुरफुरतो मी
सरसरतो
फुत्कारतोही...
तरी
कुणाच्या लाठ्यांनी मरतो?

....कुत्र्यांपासून सावध राहा

....कुत्र्यांपासून सावध राहा
ही कुतरी लूत भरलेली
गल्लोगल्ली
पाहून मुली
तुला एकली
भुन्कतील
उडवतिल
खिल्ली
चरकू नको
मागे सरकू
फक्त
डोळे वटारून पाहा
....कुत्र्यांपासून सावध राहा

Sunday, August 1, 2010

सखी...

सखी,
जर
जगायचंच असेल
तुझ्याशिवाय!
तर
कशाला हवं
येताना
'हाय'
जाताना
'बाय'!!

Sunday, November 23, 2008

माप!

ऐसी यावी
शांत झोप
मिटावे सर्व
ताण-ताप
ज्याच्या त्याच्या
पदरी पडावे
ज्याचे त्याचे
...माप!

Sunday, October 12, 2008

निसटले...

निसटले
काही
आयुष्यप्रवाही
ओंजळीत
शिंपले
मौक्तिक नाही
पाखडता
आत्मतत्त्व
उरले
भुसकट
आयुष्य
चिपाड
नुरले
रसत्व!

Tuesday, October 7, 2008

जगलो तर...

जगलो
तर
आयुष्य
असते
किती छान!
नाही तर
जीवन
ठरते-
जन्म-मृत्यूमधला
निव्वळ ताण!

Sunday, August 3, 2008

झाड आणि पाखरू (१०)

पाखरा पाखरा
कुणासाठी
घरटे इवले
बांधतोस रे?
पिले तुझी
शहाणी होताच
उडून सारी
जातील रे!